अडावद गावात भगवान नगरातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अडावद येथील लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून रात्री निर्घूण खून झाल्याचे उघडकीस आले आहे. आज दि. १ रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे अडावदसह चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी एका इसमासह महिलेचा महिन्याभरातच खून झाल्याचे दिसून आले होते.
येथील भगवान नगरमध्ये मोकळ्या जागेवर एका तरुणाचा खून झाल्याची वार्ता आज सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती पोलीसांना मिळताच अडावदचे सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजु थोरात, भरत नाईक, संजय धनगर, सतीश भोई, विनोद धनगर, भुषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत, चंद्रकांत कोळी, प्रवीण महाजन, संजय शेलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. (केसीएन)त्यांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले. काही वेळातच मयताची ओळख पटून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सदर तरुण हा लोखंडे नगरमधील बापू हरी महाजन (वय- ३५ )असल्याचे उघडकीस आले आहे.
या तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री बापूचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घून खून केल्याचे समोर आले आहे. मयताचे शव विच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मयताच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. अडावद पो. स्टे. हद्दीत महिनाभरातच झालेल्या या तिसऱ्या खूनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेत पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.
घटनेचा मागोवा घेण्यासाठी सपोनि प्रमोद वाघ यांनी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले. काही वेळातच हे. काँ. विनोद चव्हाण, पो.ना. प्रशांत कंखरे हे ‘चॅम्प’ नामक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. कविता नेरकर, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा आढावा घेतला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे व त्यांची टीम तसेच ठसे तज्ञ किरण चौधरी, रफिक शेख हे दाखल झाले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे घेतले व तपासाला गती दिली. या रहस्यमय खूनाच्या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवीत काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.