पावसाच्या अतिवृष्टीमुळे पिकांवर रोगराईची भीती
चोपडा (प्रतिनिधी) : सातपुडा पर्वतात व चौगाव येथील गडकिल्ला परिसरात सोमवारी सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील रत्नावती नदी, हरेश्वर मंदिराजवळील नवल नाला तसेच चहार्डी येथील चंपावती व रत्नावतीनदी सह तालुक्यातील सर्वच नदी, नाल्यांना मोठा पूर आला होता. यंदाच्या पावसाळ्यातील हा नद्यांना दुसरा पुर आलेला आहे.
नद्यांचा पूर बघण्यासाठी चहार्डी व चोपडा येथील नदीकाठावर येऊन नागरिकांनी एकच गर्दी करत आहे. या बाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी माहिती दिली. सातपुडा पर्वतात व चौगाव येथील गडकिल्ला परिसरात सोमवारी सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून, अद्याप तालुक्यात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही असे सांगितले.
चोपडा तालुक्यात यंदा पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि सततच्या पावासामुळे खरीप पिकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात चोपडा तालुक्यात ३१ ऑगस्ट अखेर ६५३ मिलिमीटर पावसाची नोंद तहसील कार्यालयातील दप्तरी करण्यात आली आहे. यंदा जून महिन्यात झालेल्या कमी पावसात खरीप पिके जोरदार होती परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी व पावसाच्या रिपरिपमुळे पिकांवर रोगराई पसरली आहे.