चोपडा तालुक्यातील स्थिती
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील कमळगाव ते मितावली या रस्त्यावरील पुलाचा भराव जोरदार पावसामुळे वाहुन गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर धावणाऱ्या बससह इतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा थांबली आहे. त्यामुळे बसगाड्याही येत नसल्याने शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसह नोकरदार लोकांना पायपीट करावी लागत असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कमळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात मितावली येथून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. दरम्यान, मूसळधार पावसामुळे येथील कमळगाव ते मितावली या रस्त्यावरील नाल्यावर आजुबाजुला संरक्षण भिंत नसल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे मितावली या गावावरून येणारे विद्यार्थी कमळगाव येथील होळकर माध्यमिक विद्यालयात येऊ शकले नाहीत. हा नाल्यावरील रस्ता पूर्णपणे वाहुन गेला आहे. त्यामुळे मितावली ते कमळगाव मार्गावरील एसटी बसदेखील येऊ शकत नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.
कमळगाव ते मितावली या रस्त्याचे नुकतेच म्हणजे गेल्या मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्याचे तीनतेरा वाजलेले दिसून येत आहेत. कमळगाव ते मितावली या रस्त्यावरील नाल्यावर आजूबाजुला संरक्षण भिंत नसल्याने हा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या रस्त्यावरून मितावली, पुनगाव, जळगाव येथून प्रवासी येतात. शिवाय चांदसणी येथील काळभैरव नाथाचे येथे भव्य मंदिरदेखील आहे. जागृत असलेल्या या देवस्थानात परिसरातील भाविकदेखील मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. पण हा रस्ता वाहून गेल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.