जळगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- तलवारीसह मिरवणुकीत नाचतानाचा फोटो व हातात चॉपर घेतलेला फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवारीसह मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हेशोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक फौजदार उमेश भांडारकर, विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, रतन गिते, तेजस मराठे, अमोल ठाकूर यांनी शाहूनगर पडकी शाळेच्या मागील गल्लीतून सर्फराज जावेद भिस्ती (२०) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मिरवणुकीत नाचवत असलेली तलवार काढून दिली. त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, शाहूनगर परिसरातीलच सैय्यद आफताब सैय्यद ऐजाज (२४) याचा चॉपर हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यालाही शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शाहू नगरातून ताब्यात घेतले. त्याने चॉपर काढून दिला. या प्रकरणी किशोर निकुंभ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.