चाळीसगाव शहर येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथे राहणाऱ्या एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून ९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तलाठी पतीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला पूजा राहुल आल्हाट ही राहुल कचरू आल्हाट याची पत्नी असून तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल कचरु आल्हाट, सासू मायाबाई कचरु आल्हाट, दीर तेजस कचरु आल्हाट (सर्व रा. प्रबुद्ध नगर, चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली आहे. तर एक महिला फरार आहे. दरम्यान, याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी करीत आहेत.