यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील न्हावी गावाजवळील चावदस नगर टोल नाक्याजवळ चक्कर आल्यानंतर अचानक ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दि. ७ सप्टेंबर दुपारी साडेतीन वाजता घडली. घटनेची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे.
आदित्य तुळशीराम काठोके (वय २२,रा. कासारगल्ली, फैजपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती आदित्यचे काका विलास बळीराम काठोके (वय ४७) यांनी पोलिसांना दिली. आदित्य मित्रासोबत न्हावी येथून ट्रॅक्टरवरून परत येत होता. त्यावेळी त्याने अचानक वाहन थांबवण्यास सांगितले आणि ‘मला चक्कर येत आहे’ असे म्हणाला. त्यानंतर अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
त्याला तातडीने उपचारासाठी डॉ. खाचणे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात आदित्यच्या परिवाराने आक्रोश केला. घटनेबद्दल फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार देवीदास विष्णू सुरदास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आदित्यच्या मृत्यूने फैजपूर गावात शोककळा पसरली आहे.