जळगाव शहरातील गणेशवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गणेशवाडी परिसरात चोरी करण्याच्या प्रयत्न करत असतांना आरडाओरड केल्याने पळून जाण्याच्या तयारीत असतांना पहिल्या मजल्यावरून चोरट्याने उडी घेतली. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने एमआयडीसी पोलीसांनी रंगेहात पकडले तर त्याचा साथीदार हा पसार झाल्याची घटना रविवारी २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाकुब शेख ताजोद्दीन (वय २२, रा. कासमवाडी) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. शहरातील गणेश वाडी परिसरात चेतन अशोक डहाके हे राहत असून त्यांचे वेल्डींगचे वर्कशॉप आहे. रविवारी दि. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास डहाके हे घरात झोपलेले असतांना घरात कोणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने थेट पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्यानंतर चोरटा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पळून जाता आले नाही. यावेळी त्याच्यासोबत असलेला साथीदार मात्र तेथून पळून गेला.
यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी डहाके यांच्या घराशेजारी असलेला घराच्या कंपाऊंटमध्ये संशयित चोरटा शहाकुब शेख ताजोद्दीन हा लपून बसलेला होता. यावेळी नागरिकांनी त्या चोरट्याला चांगलाच पब्लिक मार दिला. परिसरात आरडाओरड सुरु असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, गुन्हे शोध पथकातील रतन गिते, नाना तायडे, महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.