पोलिसांचा आक्षेप घेणारा खुलासा न्यायालयात दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – न्यायाधीन बंदी चिन्या जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी आणि कारागृह रक्षक दत्ता खोत याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पोलिसांचा आक्षेप घेणारा खुलासा न्यायालयात दाखल करण्यात आला . आता या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी ( १४ फेब्रुवारी ) रोजी पुढची सुनावणी होणार आहे .
जिल्ह्यात गाजत असलेल्या चिन्या जगताप हत्याकांडातील सर्व पाचही आरोपी कारागृहातील आरोपी आणि कर्मचारी आहेत . त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झालेला असला तरी ते फरार आहेत आणि कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर आहेत . पोलिसांनी हे आरोपी सापडलेले नाहीत .
या आरोपींपैकी पाचवा आरोपी दत्ता खोत याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे . या अर्जावर आजच्या सुनावणीत पोलिसांनी आपला लेखी खुलासा दाखल केला आहे . हा गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार आहेत . ते कामाच्या ठिकाणीही गैरहजर आहेत . दत्ता खोत याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो आणि तपासावर परिणाम होऊ शकतो असा आक्षेप पोलिसांनी आज न्यायालयात या जामीन अर्जावर नोंदवला आहे
मूळ फिर्यादी आणि चिन्या जगताप याची पत्नी मीनाबाई जगताप यांनीही आज या जामीन अर्जाला विरोध करणारे वकीलपत्र आणि शपथपत्र दाखल केले . हे शपथपत्र दाखल करताना मीनाबाई जगताप यांच्याकडून मनोज जाधव या कारागृह कर्मचारी असलेल्या साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याची आणि पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी घेतलेल्या आक्षेपाची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली अँड जैनोद्दीन शेख हे मीनाबाई जगताप यांची बाजू मांडत आहेत
चिन्या जगताप हत्याकांडातील साक्षीदार व सध्या नाशिकच्या किशोर सुधारालयात कार्यरत असलेले मनोज जाधव यांनी जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार दिल्याने किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांनी तशी माहिती देणारे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवले होते . या हत्याकांडातील आरोपी अधिकारी आणि कर्मचारी फरार आहेत आणि ते जळगाव परिसरातील रहिवाशी असल्याने आपल्या जीविताला येथे आल्यावर धोका होऊ शकतो अशी भीती साक्षीदार मनोज जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली होती.