मयताच्या पत्नीचा मुख्य अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनात आरोप

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- कारागृहात बंदी असणाऱ्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला असून त्यांच्या शविच्छेदन अहवालाच्या व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत संबंधित दोषी असलेल्या कारागृह अधीक्षकासह कर्मचाऱ्यांतर्फे व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देऊन फेरफार करण्याचा प्रयत्न संशयितांकडून केला जात असल्याचा अर्ज मयताची पत्नी यांनी मुख्य अधिष्ठाता, न्याय वैद्यक प्रयोगशाळा भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय, धुळे यांना दिलेल्या अर्जात केला आहे.
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे दाखल याचिका क्र. 1706/2020 नुसार जळगांव जिल्हाकारागृह बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचे मृत्यु प्रकरण दाखल असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव यांचे शवविच्छेदन अहबाल क्र.-व्हीडीएस/६७८/२०२०, दिनांक १२/०९/२०२० आणि डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगांव (खुर्द) यांचा डेथ मेमो दिनांक ११/०९/२०२० दिलेला आहे .
श्रीमती मिनाबाई रविंद्र जगताप ( मयताची पत्नी ) रा. शिवाजी नगर, हुडको कॉलनी, ता. जि. जळगांव,यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे कि ,
दिनांक ११/०९/२०२० रोजी माझे मयत पती नामे चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा जळगांव जिल्हा कारागृहातील अधिक्षक पेट्रस गायकवाड, जेलर जितेंद्र माळी व इतर रक्षक कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत, यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत न्यायालयीन कोठडीत अत्यंत निर्दयी स्वरुपात दिनांक ११/०९/२०२० रोजी मृत्यु झालेला आहे. त्यानंतर संबंधित दोषींनी वेगवेगळया मार्गाने पैसे देवून तसेच स्थानिक गुंड व राजकीय पुढा-यांची मदत घेवून पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी ऑफिसच्या कर्मचा-यांना मॅनेज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एवढे करुन काही होत नाही असे दिसत असातांना संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणून तसेच जेलच्या काही पोलीस कर्मचा-यां मार्फत पैशाचे आमिष
दाखवून धमक्या देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. सदर प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन, जळगांव येथे केवळ
अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात येवून संबंधित संशयितांना पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच प्रकरणातील साक्षीदारांना व फिर्यादींना धमकविण्यासाठी व केस मागे घेण्यासाठी संधी दिली जात आहे. या सर्व प्रकरणी मी पोलीस अधिक्षक, जळगांव, जिल्हाधिकारी, जळगांव, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक, जळगांव न्यायालय येथे फिर्यादी व तक्रारी दाखल केलेल्या आहेत.
परंतू सदर प्रक्रियेस संशयास्पदरित्या प्रचंड विलंब होत असल्याने मी अखेर नाईलाजाने संदर्भ क्र. १ नुसार मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरगाबाद येथे क्र. १७०६/२०२० अन्वये संबंधिता विरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होणे करीता याचिका दाखल केलेली आहे व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
सदर प्रकरणी माझे पती नामे चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा जळगांव जिल्हा कारागृहात मृत्यु झाल्यानंतर मला रितसर संदर्भक्र. २ व ३
नुसार शव-विच्छेदन अहवाल व डेथ मेमोची छायांकित प्रत प्राप्त झालेली असून त्यामध्ये स्पष्ट मृत्युचे कारणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच डेथ मेमो मध्ये सदर माझे पती यांचा कारागृहात मृत्यु झाला असल्या बाबत वेळेसह उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर रुग्णालयात मयताची पत्नी या नात्याने मी उपस्थित असतांना तसेच न्यायाधिश यांच्या उपस्थित असतांना इन कॅमेरा शव-विच्छेदन करण्यात आलेले आहे. त्यावेळी मी स्वत: पाहिलेले आहे की, माझ्या मयत पतीचे सर्व शरीर काळे पडलेले होते, तोंडावर, शरीरावर व छातीवर अनेक जखमा झालेल्या होत्या तसेच त्यांचा एक पाय अक्षरश: मोडून पोटावर पडलेला होता. उक्त नमुद सर्व बिभस्त चित्र पाहिल्यानंतर मी तात्काळ सर्व शासकीय यंत्रणे सह, पोलीस विभाग, प्रसार माध्यमे यांचेकडे लेखी स्वरुपात तक्रारी केलेल्या आहेत. परंतू माझ्या तक्रारींची दखल घेवून आजपर्यंत संबंधित दोषी जेल- अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी संधी दिली जात आहे. आज रोजी स्थानिक सर्व यंत्रणा मध्ये सबळ पुरावे, सबळ साक्षीदार, पोलीस विभागाचे जबाब, कैदी जबाब, डॉक्टर जबाब, हे सर्व दोषी जेल अधिका-यांचे विरोधात असल्याने व त्यांच्या लक्षात आल्याने त्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपले न्यायवैद्यक प्रयोगशाळेत अंतिम व्हीसेरा चाचणी अहवालात आपल्या संबंधित विभागातील अज्ञात अधिका-यांस लाखोंची लाच देवून फेरफार करण्याचे षडयंत्र योजिले आहे. यामध्ये जेलचे दोषी अधिकारी, रक्षक कर्मचारी,
व या मोहिमेत सामील स्थानिक आणखी दोन जेलचे रक्षक कर्मचारी आहेत. या सर्वांची पुराव्या सह नांवे मी वेळेवर मा. न्यायालयात जाहीर करणार आहे. तरी तात्काळ सदर प्रकरणी योग्य ती कारवाई होवून न्याययुक्त व पारदर्शक अहवाल देवून माझ्या सारख्या गरीब अबला महिलेस व मयतास न्याय दयावा अशी मागणीवजा विनंती मयताची पत्नी मीनाबाई रवींद्र जगताप यांनी अर्जामध्ये केली आहे .







