चिन्या जगताप मृत्यू प्रकरणी कलाटणी
जळगाव (प्रतिनिधी) : चिन्या उर्फ रवींद्र जगताप या कैद्याच्या मृत्यूप्रकरणी येथील जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षक, तुरुंगाधिकारी आणि रक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि घटनेचे प्रत्यक्षदर्शी तडकाफडकी कारागृहातून वर्ग केलेले आणि कारागृहात असलेले न्यायाधीन बंदीचे जबाब घेण्यात यावे, सत्य बाहेर येईल या मागणीसाठी रवींद्र जगताप यांच्या पत्नी मीनाबाई जगताप यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहर पोलीस स्टेशनला मारहाणीच्या एका दाखल गुन्ह्यात पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप हे जळगाव जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून दाखल होते. दि. ११ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी व रक्षक यांनी अमानुषपणे मारहाण करून जिल्हा कारागृहातून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल करण्यात आले होते. जिल्हा कारागृह येथे ११ सप्टेंबर रोजी पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक ,तुरुंगाधिकारी आणि रक्षक यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मीना जगताप यांची आहे. आज पतीचा मृत्यू होऊन ४० दिवस पूर्ण झाले आहे. पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांचा शवविच्छेदनचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात माझ्या पतीचा छातीत मार लागल्यामुळे (Blunt Truama to chest) मृत्यू झाला असे स्पष्ट झाले आहे. तरी या प्रकरणातील गुन्हेगार कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी आणि एक रक्षक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन यांना त्वरित अटक करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कारागृहात चिन्याला मारहाण झाली हे पाहणारे प्रत्यक्षदर्शी न्यायाधीन बंदी हे जेलरविरुद्ध जवाब देतील म्हणून तडकाफडकी बदली केलेले कैदी बाबा काल्या, राज चव्हाण, गोलू सावकारे, वैभव गवळी यांना जळगावहुन जालना येथे कारागृहात वर्ग केले आहे. हे चिन्या मृत्यू प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे माहिती पडले आहे. तसेच सध्या जळगाव कारागृहातील न्यायाधीन बंदी सतिश गायकवाड, सचिन सैदाणे,अँपी मिर्झा, फिरोज बैग यांनी ही पती रवींद्रला मारहाण करतांना बघितले असल्याची माहिती आहे. यांचा जवाब जर घेतला तर सत्य समोर येईल. सदर या सर्व न्यायाधीन बंदिचा जबाब घेण्यात यावा अशीदेखील मागणी निवेदनात केली आहे.