भुसावळ बाजारपेठ, एलसीबीची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील एका ५ वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. भिक मागवण्याच्या उद्देशाने या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून, मुलीची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ गिलाला (रा. अजदरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास, भुसावळ बस स्टॅन्ड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्रासमोर ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादी काजल गुन्ना ठाकूर (वय २९, रा. भाखा अमरपुर, जि. दिंडोरी, म.प्र.) या त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीसह तेथे होत्या. यावेळी, अज्ञात आरोपीने सार्वजनिक जागेवरून त्यांच्या मुलीचे अपहरण केले. या घटनेने एकच खळबळ उडाली.याप्रकरणी, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य आणि एका चिमुकलीच्या जीविताचा प्रश्न असल्याने, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी तपासासाठी तातडीने सूचना दिल्या. भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके तपासासाठी रवाना झाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या नेटवर्कचा प्रभावी वापर केला. तपासादरम्यान, हा गुन्हा गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ गिलाला (रा. अजदरा) यानेच केल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री पटताच, पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी गोरेलाल कछवे याला बोदवड तालुक्यातील उजनी देवस्थान परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चिमुकलीला भिक मागवण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पीडित ५ वर्षीय मुलीची सुखरूप सुटका केली आणि तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले. आपल्या मुलीला सुखरूप परत मिळताच फिर्यादी मातेने पोलिसांचे आभार मानले. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, अटक केलेला आरोपी गोरेलाल कछवे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मध्य प्रदेशातील चैनपूर पोलीस स्टेशन येथे देखील दिनांक ०३/०५/२०२२ रोजी भा.दं.वि. कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली सहा. पो निरी नितीन पाटील, पोउपनिरी गंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ कांतीलाल केदारे, पोहेकॉ रर्वीद्र भावसार, पोशि योगेश माळी, पोशि प्रशांत सोनार, पोशि भुषण चौधरी, पोशि अमर अढाळे, पोशि जावेद शहा, पोशि हर्षल महाजन, पोशि जीवन कापडे, पोशि योगेश महाजन, पोशि सचीन चौधरी, पोशि महेंद्रसींग पाटील, पोशि मोहसीन शेख, स्थागुशाखेचे पोउपनिरी रविंद्र नरवाडे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ अक्रम शेख, पो हे कॉ गोपाल गव्हाळे, पो ना विकास सातदिवे, पोशि प्रशांत परदेशी, पोशि राहुल वानखेडे, पो शि राहुल रगडे, पोशि उदय कापडणे, पो शि रविंद्र चौधरी, पो शि किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पो शि मुबारक देशमुख, पो शि पंकज राठोड, पो शि प्रणय पचार अश्यांनी केली आहे.









