जळगाव तालुक्यात मांजामुळे ६ जखमींची नोंद, रुग्णालयात उपचार
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणाऱ्या एका ७ वर्षीय चिमुकला पतंग उडवताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ श्लोक कैलास गिरगुणे हा ७ वर्षीय बालक आपला कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान तो त्याच्या भावासोबत आज मंगळवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पतंग उडत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मांजामुळे जखमी ५ जणांनी उपचार घेतले आहे. यात परशुराम विनोद गुंजे (वय ८, मटण मार्केट, जळगाव), मंगलाबाई महाजन (वय ५५, मेहरूण, जळगाव), फिरोज खाटिक (वय २५, रा. वावडदा ता. जळगाव) असे जखमी आले आहे. याशिवाय आणखी दोघे किरकोळ जखमी झाले आहे.