बुलडाणा ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील चिखली शहराच्या मध्यवर्ती जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरात मुख्य रस्त्यावर आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानावर काल रात्री सशस्त्र दरोडा पडला. दोघा दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकानमालक कमलेश पोपट यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून शहरात खळबळ उडालीय. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला.
चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट रात्री दुकानाचे मुख्य शटर बंद करून आत थांबले होते. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरताच त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने आणि तलवारीने हल्ला केला. या झटापटीत दरोडेखोर रोख रक्कम लुटून फरार झालेत. जमिनीवर पडलेले कमलेश पोपट यांनी तशाच जखमी अवस्थेत मोबाईल फोनद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांना कळताच कमलेश पोपट यांना चिखलीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही दिवसात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.