जळगाव शहरातील समर्थ नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर समर्थ नगरात घरासमोर चिखल लोटल्याच्या कारणावरून एका कुटुंबीयांनी दोन तरुणांना चापतबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण करून जबर दुखापत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश सुखदेव भुसारे (वय ४७, रा. समर्थ नगर, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयसमोर, जळगाव) असे फिर्यादी व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुरेश भुसारे हे त्यांची पत्नी लताबाई यांचेसह घरी असताना त्यांची मुले हेमंत व प्रशांत भुसारे हे फटाके घेऊन घरी आले. त्यावेळेला भुसारे यांच्या घरासमोर राहणारे सुनीताबाई सावंत या रस्त्यावरील चिखल भुसारे यांच्या घराकडे लोटत होत्या. याबाबत हेमंत यांनी चिखल आमच्या घराकडे लोटू नका असे सांगितले.
त्याचा राग आल्याने सुनीताबाई सावंत यांचे पती प्रमोद सावंत, मुले भावेश प्रमोद सावंत, कल्पेश प्रमोद सावंत अशांनी भुसारे यांची मुले हेमंत व प्रशांत यांना शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्रशांत याच्या डोक्यात कल्पेश याने लाकडी काठीने मारहाण करून जबर दुखापत केली. या प्रकरणी सुरेश भुसारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.
००००००००००००००००००००









