“स्वस्थ नारी सशक्त परिवार” : जीएमसीचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाने अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रस्तावित चिंचोली येथील परिसरात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” उपक्रमाचा भाग म्हणून एक बहुविशेष आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यात एकूण १३० महिला बांधकाम कामगारांची व मुलांची व्यापक आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात औषधवैद्यक शास्त्र, प्रसूती आणि स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, नेत्ररोग, त्वचारोग आणि बालरोग विभागातील डॉक्टरांची बहुविद्याशाखीय टीम सहभागी झाली होती. महिलांची व त्यांच्या मुलांची आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. रुग्णांना आवश्यक औषधे वाटण्यात आली. तसेच पोषक आहाराबाबत आरोग्य जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या शिबिराचे संचालन अभियानाच्या नोडल अधिकारी तथा जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावसकर यांनी केले.
शिबिरात डॉ. योगिता बावसकर यांचेसह सहायक प्रा. डॉ. नेहा भंगाळे, सहायक प्रा. डॉ. डॅनियल साझी, डॉ. प्रतीक्षा औटी, डॉ. अमृता शास्त्री, डॉ. शाहिद हमीद, डॉ. उत्कर्ष वशिष्ठ, चेतन पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.