छताला गळफास लावून इसमाची आत्महत्या
अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील कुंटे रोडवरील एका इसमाने छतावर जाऊन लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदीप चिंधु पाटील (वय ३७, रा. कुंटे रोड, अमळनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. त्याच्या घराला लागून दुकान आहे. दुकानाच्या छतावर दुसऱ्या मजल्यावर जाऊन प्रदीप पाटील याने लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना २५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयत प्रदीप हा अविवाहित असून भाजीपाला विक्री व्यवसाय करायचा. छतावर दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले असता प्रदीपने गळफास घेतल्याचे दिसून आले.
आत्महत्या करून तीन चार दिवस झाले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. प्रदीपचा मोठा भाऊ प्रकाश याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत.