जिल्हा प्रशासनाचे पशुपालकांना आवाहन
जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील पशुपालकांनी चारा उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग, जळगावच्या वतीने ‘चारा समृद्ध गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाने पशुपालकांना वैरण बियाण्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली. सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित केले जात आहे. या शिबिरांमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष माहिती कक्ष उभारण्यात आले असून, त्याद्वारे पशुपालकांना विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जात आहे.
‘चारा समृद्ध गाव’ अभियानांतर्गत प्राप्त झालेली वैरण बियाणे किट या समाधान शिबिरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना वितरित केली जात आहेत. यासोबतच जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकत (FMD) रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाबाबतही जनजागृती केली जात आहे.
पशुपालकांनी स्वतःच्या शेतात चारा उत्पादन वाढवून पशुधनासाठी वर्षभर पुरेसा चारा उपलब्ध करून घ्यावा आणि या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक पशुपालकांनी अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रदीप झोड यांनी दिली आहे.








