स्टिंग ऑपरेशननंतरच्या निलंबन कारवाईवर नाराजी
जळगाव ( प्रतिनिधी ) – माझ्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेले केवळ ४ पोलीस कर्मचारी निलंबित करून चालणार नाही , अशी कामे ज्यांच्या जोरावर हे लोक करतात त्या खऱ्या सूत्रधारावर कारवाई झाली पाहिजे , चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित झाले पाहिजेत , अशी मागणी आज आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे .
आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेले व कन्नड घाटात बेकायदा वसुली करणारे ४ पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार निलंबित झाले आहेत . त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की , जे निलंबित झाले ते खरे सूत्रधार नाहीत . त्यांचा प्रमुख निलंबित झाला पाहिजे . यासाठी मी आता पोलीस महानिरीक्षकांना भेटणार आहे आणि माझी भूमिका मांडणार आहे . विधिमंडळाच्या अधिवेशनातही मी खरे दोषी निलंबित होत नाहीत तोपर्यंत झगडणारा आहे मी थांबणार नाही , असेही ते म्हणाले .
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालवत चालकाच्या वेशात कन्नड घाटात केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद उमटत आहेत अवजड वाहनांना बंदी नसतांना कन्नड घाटात नाकाबंदी करत प्रत्येक ट्रक चालकांकडून 100, 300, 500 रुपये असे जशी जमेल तशी वसुली करणा-या पोलिस कर्मचा-यांचा पर्दाफाश आ. मंगेश चव्हाण यांनी केला होता.
नाकाबंदीच्या नावाखाली ट्रक चालकांकडून वसुली करणारे हे.कॉ. गणेश पाटील, प्रकाश ठाकुर, पो.कॉ.सतिष राजपुत, संदीप पाटील यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या चौघांना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार मुंढे यांनी निलंबित केले त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे. निलंबन काळात चौघे कर्मचारी खासगी नोकरी, व्यवसाय करु शकणार नाहीत.