वादळात आणि पुरात भरभक्कम ताठ असलेले मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात परंतु, झुकणारी इवलीशी गवताची पाती मात्र सुरक्षीत असते. ‘अकड’ असणे आणि नम्रता असणे त्याचे परिणाम काय होतात या उदाहरणातून लक्षात येते. व्यक्ती, वस्तू, पदार्थ, सामुग्री या गोष्टीही पकडून ठेवायच्या नसतात. उपयोग झाल्या की सोडून द्यायच्या असतात. चांगल्या जीवनासाठी आपण ‘अकड’ व ‘पकड’ सोडायला हव्यात असा मोलाचा सल्ला प.पू. सुमितमुनिजी म. सा. यांनी पर्युषण पर्वाच्या औचित्याने सुरू असलेल्या आजच्या प्रवचनातून दिला. यावेळी प.पू. ऋजुप्रज्ञ मुनीजी व प.पू. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला.
खरे पाहिले तर या जगतात आपले स्वतःचे असे काहीच नसते, जन्म आई वडील देतात, शिक्षण गुरू देतात, काम, रोजगार दुसरीच व्यक्ती देते, विवाहासाठी श्वसूर आपली कन्या देतात, पत्नी मुलांना जन्म देते, शेवटी अंतिम दिनी दुसरेच स्मशानभूमिमध्ये पोहोचवितात. तरी देखील आयुष्यभर आपण गर्वाने वागत आलेलो असतो. माझा मुलगा आयआयटीमध्ये शिकला, विदेशात शिकला, आयएसएस झाला असा गर्व करणेही व्यर्थ आहे. आयुष्यभर आपण ‘मी’ म्हणजे मैं, मैं करत असतो. पैसे, बुद्धी, शक्ती, मान आणि परिस्थितीची अनुकुलता या गोष्टींचा गर्व माणसाने कधीच करायला नको. मान, सन्मान, स्वाभिमान हे सर्व गर्व वाढविणारे आहेत. दहा कोटी रुपयांचां बंगला बांधणारा मोठ्या कौतुकाने तो बंगला दाखवितो. अगदी शौचालय २५ लाखाचे आहे असे ही अभिमानाने सांगतो परंतु अशा मिथ्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आत्मकल्याणाच्या दृष्टीने आपण आपली कृती करायला हवी. अकड आणि पकड या दोन्ही गोष्टी सोडण्याचा संकल्प आजच्या दिवशी घेतला तर चांगल्या जीवनाकडे वाटचाल होऊ शकेल असे आवाहन प्रवचनातून केले गेले.