भुसावळ बसस्थानकातील घटना कॅमेऱ्यात कैद
भुसावळ (प्रतिनिधी) : रावेर-छत्रपती संभाजीनगर बस भुसावळ बस स्थानकावर आली असता प्रवासी मुख्य दरवाजातून बसमध्ये प्रवेश करीत असताना मात्र एका सैनिकाने ड्रायव्हरकडील दरवाजातून चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्रायव्हरने त्याला हटकले असता त्याने बसवर दगडफेक केली.
स्वतःला सैनिक सांगणाऱ्या जालनाच्या दत्ता घोलप याने हा प्रकार केला आहे. बसमध्ये चढू न दिल्याने चक्क बस स्टँडवर उभ्या बसवर चार ते पाच वेळा दगडफेक करून समोरील काच फोडली. या घटनेमुळे बस स्थानकात एकच गोंधळ झाला. बस क्रमांक (एमएच २० बीटी २६५५) रावेर येथून २१ प्रवासी घेत भुसावळ बस स्थानकावर आली. येथून प्रवासी हे संभाजीनगरला प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दी झाली. सुटीवर आलेला जवान दत्ता घोलप (रा. जालना) याने चालकाकडील दरवाजातून बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वाहकाने येथून चढू नका, असे सांगताच त्याने बसची दर्शनीय भागाची काच फोडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.