चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – कुटुंबीय घरात झोपलेले असताना घराच्या मागील दरवाजाचे कडी-कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढलेली १ लाख ८० हजारांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली. चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड, हनुमान नगर येथे ही घरफोडीची घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅरेज चालक रवींद्र कारभारी बोरसे हे कुटुंबासह पाटणादेवी रोड हनुमाननगर भागात राहतात. घराच्या वरच्या मजल्यावर गणपती मूर्ती तयार केल्या जातात. सोमवारी मध्यरात्री २:३० वाजेनंतर खोलीत येऊन झोपले. पहाटे सव्वा सहाच्या सुमारास झोपेतून उठले असता त्यांच्या वडिलांना घराच्या मागच्या दोन दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. मागच्या खोलीच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
कपाटात सोन्याचांदीचे दागिने ठेवलेले होते. तसेच दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढून आणलेले १ लाख ८० हजार रुपये देखील कपाटात ठेवलेले होते. तेही कपाटात दिसून आले नाही. घराच्या मागच्या दोन दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील कपाटातून १ लाख ८० हजार रूपये रोख, ५० हजार रूपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसूत्र पोत, १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे बेले असा सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही चोरी दि.४ रोजी मध्यरात्री अडीच ते पहाटे सव्वा सहा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रवींद्र कारभारी बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास शहर पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील हे करीत आहेत.