आ. मंगेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे पाचवे वर्ष
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- सदगूणी, निर्व्यसनी, नितिवंत व स्वाभिमानी अशी एक पिढी घडावी. हाच प्रामाणिक भाव ठेवून चाळीसगाव पंचक्रोशीतील तरुणाईसाठी ५ वर्षापूर्वी ‘तरुणाईचा ध्यास करारी…आम्ही रायगड वारकरी’ हा मंत्र घेत चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी रायगड मोहिमेला सुरुवात केली. यंदाही नव्या ध्यासाने ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रायगड वारीचे प्रस्थान होत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील या शैक्षणिक वर्षात ११ वी व १२ वी पास असणाऱ्या २ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यात प्रथम आलेल्या १००० विद्यार्थ्यांना यावर्षीच्या रायगड मोहिमेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच यंदाच्या रायगडवारीला विशेष महत्व आहे. रायगडी ९ रोजी तिथीनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा ‘याचि डोळा याचि देही’ हजारो विद्यार्थी अनुभवणार आहेत. विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी शिवछत्रपतींचे पाईक म्हणून समस्त चाळीसगाववासियांनी देखील आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
९०० किमी अंतराची रायगड वारीत शिवप्रेमींचा प्रवास सुखकर व्हावा व त्यांची जेवणाची – पाण्याची आबाळ होऊ नये यासाठी आ. मंगेश चव्हाण यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. शिवप्रेमींच्या प्रवासासाठी ४५ राज्य परिवहन महामंडळाच्या २५ नव्या कोऱ्या बसेस तसेच ५० खाजगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या चार दिवसात ५ हजाराहून अधिक व्यक्तींचे जेवण आणि नाश्ता ठिकठिकाणी चाळीसगाव येथून सोबत असणाऱ्या आचारी यांच्याकडून बनवला जाणार आहे. तसेच प्रवासात ठिकठिकाणी आणि रायगड किल्य्यावर जाताना शिवप्रेमींसाठी १ लिटरच्या १० हजार पाणी बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ असे आकर्षक टी शर्ट देखील दिले जाणार आहेत. सोबत आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून दोन रुग्णवाहिका व औषधोपचार कीट देखील असणार आहे. यासाठी जवळपास १०० हून अधिक भाजपा कार्यकर्ते / स्वयंसेवकांची यंत्रणा गेल्या महिनाभरापासून कामाला लागली आहे. या सर्व प्रवासात आमदार मंगेश चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच राहणार असून त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता शिवप्रेमींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असल्याचे दिसते.