मेहुणबारे पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड
चाळीसगाव (प्रतिनिधी):- दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) येथील सरपंच आणि उपसरपंच यांना रस्ते अपघाताचा बनाव रचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहनही जप्त केले आहे.


दि. २६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास दस्केबर्डीचे सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे बुलेटने चाळीसगावहून गावाकडे जात होते. शिदवाडी शिवारात समोरून येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सरपंच भगवान देवरे हे गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला याप्रकरणी रस्ते अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, उपसरपंच ईश्वर अहिरे यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासाचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पिकअप वाहन मालकास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, दस्केबर्डी गावातील राजकीय मतभेदातून हा कट रचल्याचे समोर आले. संशयित आरोपींनी संगनमत करून सरपंच आणि उपसरपंचांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच पिकअप ने धडक दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी, लक्ष्मण अशोक महाजन (वाडे, ता. भडगाव – पिकअप मालक) या संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी आता या गुन्ह्यात अपघाताची कलमे कमी करून ‘फौजदारीपात्र कट रचून खुनाचा प्रयत्न’ केल्याची कलमे जोडली आहेत. या कामगिरीत सपोनि प्रवीण दातरे, पीएसआय सुहास आव्हाड, पीएसआय विकास शिरोळे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास पीएसआय सुहास आव्हाड आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय लाटे करत आहेत.









