चाळीसगावात कॉलेज ग्राऊंड परिसरात घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील कॉलेज ग्राऊंडजवळील हनुमान मंदिराजवळून मोटारसायकलने जात असलेल्या दाम्पत्याला अडवून, फिर्यादीच्या हाताचा चावा घेत जखमी करून १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत (मंगळसूत्र) हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयितासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वसंत शंकर पवार (वय ५५, रा. पारिजात नगर, धुळे रोड, चाळीसगाव) हे २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पत्नी सोनल पवार यांच्यासह मोटारसायकलने करगाव रोडने जात होते. कॉलेज ग्राऊंडजवळील हनुमान मंदिराजवळ आले असता, पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या यामाहा एफ-झेड बाईकवरून आलेल्या तिघांनी त्यांना गाठले. संशयित आरोपी महेश बाळासाहेब जाधव (रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी वसंत पवार यांच्या हाताला जोरात चावा घेऊन त्यांना दुखापत केली.
याचवेळी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (मिनी माळ) जबरदस्तीने हिसकावून आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या सोन्याच्या पोतीची किंमत १ लाख ५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर हे करत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.









