तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव न्यायालय परिसरात एका वकिलावर लोखंडी सुरी आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी ॲड. समीर अफजल शेख (वय ४५, रा. नारायण वाडी, चाळीसगाव) हे २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे न्यायालयात आपले काम करत होते. यावेळी संशयित आरोपी नाझ उर्फ माज आरिफ खाटीक याने त्यांना फोन करून ते कुठे आहेत याची खात्री केली. काही वेळातच आरोपी आरिफ रहेमतुल्ला खाटीक हा आपल्या दोन मुलांसह (दानिश आणि नाझ) त्या ठिकाणी पोहोचला. ‘आज याला संपवून टाका’ असे आरिफने म्हणताच, दानिशने आपल्या हातातील सुरीने समीर शेख यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांनी वेळीच बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर नाझ याने कोयत्याने डोक्यावर वार केला, जो अडवताना शेख यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. हा हल्ला संशयित आरोपी आरिफ खाटीक याच्याकडून प्लॉट खरेदी करण्याच्या व्यवहारातून झालेल्या वादातून झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी वकिलावर चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिथेच त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि शंकर मुटेकर करीत आहेत.









