संशयितांच्या घरून शस्त्रास्त्रे जप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पोदार शाळेजवळ असलेल्या परिसरात दुचाकीवर आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी सुमित भोसले यांच्या घरावर दगडफेक करून हवेत गोळीबार केला. ही घटना ७ रोजी मध्यरात्री ११:४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत यातील अज्ञात व्यक्ती तेथून पसार झाले. घटनास्थळी संशयित आरोपी सुमित भोसले याचे घर असल्याने हा गुन्हा सुमित भोसले व महेंद्र मोरे यांच्या मुलांमधील पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्ह्यातील संशयित महेंद्र मोरे यांच्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक त्यांच्या घरी गेले; परंतु तेथे कोणीही आढळून आले नाही. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी मोरे यांच्या घराची त्यांचा मोठा मुलगा संकेत याच्या उपस्थितीत झडती घेऊन पंचनामा करण्यात आला.
या पंचनाम्यात त्याच्या घरातून घातक हत्यारे जप्त करण्यात आली. यामध्ये कोयता, गुप्ती, सहा जिवंत राऊंड, एक स्टीलची परशू, कुहाड, एक बेसबॉल खेळण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी बॅट होती. एक जिवंत काडतूस, तीन खाली पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेने या परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सारंग अशोक बेलदार (चाळीसगाव) यांच्याकडून घटनेची अधिक चौकशी करण्यात आली व त्यांच्या फिर्यादीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे स्वतः करीत आहेत.