फोनवर खोटी माहिती देणे भोवले
चाळीसगाव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे, चाळीसगाव येथील आरपीएफ पथकाने बॉम्ब असल्याची बतावणी करून रेल्वे प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या संशयिताला शिताफीने जेरबंद केले आहे. दरम्यान, पोलिसांनी स्टेशनवर तपासणी करून बॉम्ब आहे काय याची खात्री करून घेतली होती.
पोलीस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर दि. ०९ रोजी रात्री सव्वा नऊ वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळवण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर व्यवस्थीत शोधा-शोध केली.
आरपीएफ डॉग स्क्वॉड मनमाड यांच्या स्निफर डॉगचा वापर करण्यात आला. १ ते ४ पर्यंतचे सर्व प्लॅटफॉर्म तपासण्यात आले आणि तेथे बॉंब अथवा कोणतीही संशयास्पद, आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. तथापि, लाइव्ह लोकेशनच्या तपासणीत कॉलरचा तपशील त्याच्या स्टेशनजवळील स्थानासह उघड झाला.
जळगाव येथील पोलिस पथक आणि आरपीएफ डॉग स्क्वॉड, मनमाड यांनी त्वरित कारवाई केली आणि सव्वा अकरा वाजता संशयिताला पकडण्यात आले. मानसिक अस्वस्थ वाटत असलेल्या संशयित आरोपी विकास एकनाथ पाटील याने खोटा बॉम्ब कॉल केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दि. १० रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्य रेल्वे आरपीएफ आणि शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि जलद तपास कौशल्य दाखवून अवघ्या २ तासांच्या कालावधीत या प्रकरणाची उकल केली आहे.