जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण-भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आलेले आहे. गेल्या दीड वर्षांपासून अहिरे यांच्या शेतात आर्य परिवार कामाला आहे. त्यांच्या या परिवारात सुभाष सिंह आर्य,त्यांची पत्नी , ५ मुली, १ मुलगा असून परिवारातील मोठी मुलगी संजना ही भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती. (केसीएन) बहिणी सोबत जावे म्हणून रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९ वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८ वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३ वर्ष) आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४ वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) ही चार मुले रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास सोबत गेली.तर दीड वर्षांची परी हि घरी होती .
धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. होत्याचे नव्हते झाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. दरम्यान पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी इम्रान खान,राजू नाईक,किरण सोनावणे या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मदत केली. (केसीएन) काहींनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले. त्यानंतर स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संदीप पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी घटनेची माहिती घेतली. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. मंदार करंबळेकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (केसीएन) यावेळी पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.