हजारो भाविकांच्या उपस्थितीत चाळीसगावचा एकदंत – सांस्कृतिक महोत्सवात हरिकीर्तन
चाळीसगाव (प्रतिनिधी ) – सुप्रसिद्ध कीर्तनकार, रामायणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांचे हरीकीर्तन “चाळीसगावचा एकदंत – सांस्कृतिक महोत्सवाच्या” दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ढोक महाराजांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून रामायणातील विविध दाखल्यांचा आधार घेत सद्यस्थिती वर भाष्य केले असता उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. खान्देशी लोक खूप मायाळू व दानशूर असून ज्या आळंदी मध्ये ज्ञानोबा माऊली व त्यांच्या भावंडाना शिधा मिळत नव्हता, ज्ञानदेवांची मांडे खायची इच्छा झाली तेव्हा खापर मिळाला नाही त्या आळंदी येथे खान्देशातून ५ ट्रक मांडे व २० हजार लिटर आंबेरस पाठविला गेला असे खान्देश वासीयांचे जाहीर कौतुक ढोक महाराज यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण हे परमार्थ मनात ठेवून निस्वार्थपणे चाळीसगाव वासीयांची सेवा करत आहेत, मागितल्यावर मिळते ते आश्वासन असते आणि न मागता मिळतो तो आशिर्वाद असतो. आमदारांची पंढरपूर वारी, रायगड वारी, कोरोना काळातील जनसेवा पाहता त्यांना जनतेचा आशिर्वाद न मागता सदैव मिळत राहील असे प्रतिपादन ढोक महाराजांनी केले.
यानिमित्ताने आमदार मंगेश चव्हाण उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना म्हणाले की, राज्याला मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळेच आपल्या राज्याची, संस्कृतीची जगाला ओळख झाली आहे. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी रामायणाच्या माध्यमातून राज्याला अध्यात्मिक संस्कृतीची दिशा दिली असे असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
मी जो काही आहे तो चाळीसगाव वासीयांमुळे–आ. मंगेश चव्हाण
दिलेला शब्द पाळणे ही शिकवण मला माझ्या वारकरी आई वडिलांकडून मिळाली आहे. हीच शिकवण माझी उर्जा आहे. मी आज जनतेची सेवा करू शकतो ते केवळ वारकरी भागवत धर्माची शक्ती माझ्या पाठीशी आहे म्हणूनच. ही सुप्त आध्यात्मिक शक्तीमुळेच ग्रामपंचायत मध्ये पाणी सोडणाऱ्या वारकरी-कष्टकऱ्याचा मुलगा आमदार होऊ शकला. मी जो काही आहे तो चाळीसगाव वासीयांमुळे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी काम करत राहणार आहे. यानिमित्ताने एकच प्रार्थना करतो की, भगवंता मला इतकंच दे की मला कधीच उपाशी राहू नको देऊ आणि माझ्या घरी आलेल्या कुणालाही उपाशी जाऊ देऊ नको असे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त करताच उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले.