नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने राजकीय वातावरणात चैतन्य
चाळीसगाव (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये आयोजित आमदार मंगेश चव्हाण यांच्या जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदविल्याने परिसरात निवडणुकीचा माहोल तापला. विशेषतः महिलांची मोठ्या संख्येतील उपस्थिती लक्षवेधी ठरली.
सभेत बोलताना आमदार चव्हाण यांनी गेल्या तीन ते चार दशकांपासून नगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या गटाकडे विकासाच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. प्रभागापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर राजकीय नेतृत्वाची वस्ती असूनही रस्ते, स्वच्छता, गटार व्यवस्था आणि मूलभूत सुविधा यांचा अभाव कायम असल्याने नागरिक निराश आहेत, असे त्यांनी नमूद केले. अनेक वर्षे ठराविक मंडळी निवडून येऊनही परिस्थितीत बदल न दिसण्यामागे जात-धर्माच्या आधारावर होणारी निवडणूक आणि शेवटच्या क्षणी मतदारांना भुलविण्याचे प्रयत्न जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता मात्र बदलाची वेळ आल्याचे सांगत, प्रभाग विकासाची शंभर टक्के जबाबदारी स्वतः स्वीकारत असल्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह प्रभागातील दोन्ही नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्यास प्रभागातील रस्ते, स्वच्छ परिसर आणि मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक सुविधा साकारण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
नागरिकांच्या व्यापक उपस्थितीने उत्साहात पार पडलेली ही सभा आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधील राजकीय समीकरणे नव्या दिशेने वळण्याची चिन्हे स्पष्ट करत गेली.










