आ. मंगेश चव्हाण यांची पंचायत समितीसह पोलीस स्टेशनला धडक
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यात मोठ्या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केले होते. मात्र पंचायत समिती मधील रोहयो विभागातील एपीओ, टिपीओ, ज्यू इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून २० ते २५ हजार रुपये लाच घेऊन आपल्या तुंबड्या भरल्या असल्याच्या तक्रारी आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे येत होत्या. एव्हडे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने अखेर आज सोमवारी २८ रोजी तक्रारी घेऊन शेतकऱ्यांसह आ. मंगेश चव्हाण यांनी पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची कानउघाडणी केली.
गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समिती मध्ये सिंडिकेट असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचे आ. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तेथे उपस्थित शेतकऱ्यांसह आ. मंगेश चव्हाण यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समिती मधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात रीतसर तक्रार दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना आ.मंगेश चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी – कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आ. मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.