नदीपारच्या विकासासाठी एल्गार ! वंचित ठेवणाऱ्या प्रवृत्ती विरोधात ही निवडणूक – आ. मंगेश चव्हाण
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरू लागला आहे. प्रभाग क्र. १३ व १४ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी दोन्ही प्रभागातील नागरिकांनी ‘द बेस्ट चाळीसगाव’च्या विकास व्हिजनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
आमदार चव्हाण यांनी या सभेमध्ये बोलताना स्पष्ट केले की, “ही निवडणूक जात, धर्म, पक्ष, गट–तट याच्यापलीकडील आहे. नदीपलीकडील भागांना अनेक दशके मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रवृत्तीविरोधात हा निर्णायक लढा आहे.”
वंचनेची कटू वस्तुस्थिती
या नदीपारच्या नागरिकांनी वर्षानुवर्षे एका विशिष्ट पक्षाला आणि विचारधारेला निष्ठा दाखवून नगरसेवक निवडून दिले. मात्र, दुर्दैवाने त्यांना साध्या मूलभूत सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे, असे आ. चव्हाण यांनी नमूद केले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या अल्प कालावधीतच या भागातील विकासाला गती दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे, तसेच नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे.
”हा केवळ विकासाचा प्रारंभ आहे,” असे सांगत आ. चव्हाण यांनी आपला ठाम निर्धार व्यक्त केला. “येणाऱ्या काळात नदीपलीकडील प्रत्येक नागरिकांच्या जीवनमानात वास्तविक आणि सकारात्मक बदल घडवून आणणारी आणखी मोठी व महत्त्वाकांक्षी विकासकामे करण्याचा माझा संकल्प आहे.”
या विकासाचा वेग अधिकाधिक वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण, तसेच प्रभाग क्र. १३ व १४ मधील भाजपचे सर्व उमेदवार यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून आपण सर्वांनी विकासाला हातभार लावावा, असे कळकळीचे आवाहन आमदार चव्हाण यांनी यावेळी मतदारांना केले.










