शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरांमध्ये दि. १६ मे २०२४ रोजी झालेल्या घरफोडी मध्ये ५४ हजाराचे दागिने लांबवण्यात आले होते. या प्रकरणि पोलिसांनी सखोल तपास करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
चाळीसगांव शहरातील शास्त्रीनगर भागात दुर्गा मंदीराजवळ राहणारे दिलीप रघुनाथ चौधरी (वय ५८, रा.शास्त्री नगर, चाळीसगाव) यांच्या घरातुन दि. १६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील बेडरुम मधील लोखंडी कपाटातील ५४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार पोउपनिरी सुहास आव्हाड, सफौ / विश्वास पाटील, पोहेकॉ योगेश बेलदार, अजय पाटील, राहुल सोनवणे, पोकों/ निलेश पाटील, अमोल भोसले, नंदकिशोर महाजन, गणेश कुवर, मोहन सुर्यवंशी, विनोद खैरनार, शरद पाटील, अश्यांनी सदर गुन्ह्यातील सी.सी.टी.व्ही. फुटेज प्रमाणे मिळते जुळते वर्णनाचे असल्याचा संशयीत इसम नामे किशोर तेजराव वायाळ (वय ४२, रा. मेरा बु ता. चिखली जि बुलढाणा) हा असल्याने निष्पन्न करून त्यास दि. २८ जून रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यातील ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला आहे. सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमुद गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/ योगेश बेलदार व पोकों/ निलेश पाटील हे करीत आहेत. तरी दिवसा व रात्रीच्या वेळी आणखी अश्याच प्रकारचे गुन्हे घडु नये म्हणुन रहिवाश्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोरील लाईट चालु ठेवावे. तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या कॉलनीत सी.सी.टी.व्ही. बसविण्याबाबत चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे. जेणे करुन चोरीच्या गुन्ह्यांना कायम स्वरुपी पायबंद घालण्यास मदत होईल.