चाळीसगाव तालुक्यात पोहरे येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पोहरे येथे बसचालकाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी दि. २ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोहरे येथील रहिवासी एसटी बसचालक भास्कर सोमा माळी (वय ४५) हे मेहूणबारे गावी कुटुंबासह राहत होते. शेतीच्या कामासाठी ते १५ दिवसापासून पोहरे येथे राहत होते. दि.२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भास्कर माळी यांचे भाऊ अशोक माळी हे घरात ठेवलेले खत घेण्याकरीता गेले असता घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी आवाज दिला. बराच वेळ झाला तरी भास्कर माळी हे दरवाजा उघडत नसल्याने भाऊ व घराशेजारी लोकांनी दरवाजा उघडला असता भास्कर माळी हे दरवाजाला लागून असलेल्या भिंतीतील लाकडी खुंटीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
यावेळी भास्कर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. अशोक सोमा माळी यांनी खबर दिल्यावरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.