जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाचे कौतूक
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालिकेवर महागडी समजली जाणारी “कॉंक्लेअर इंप्लांट” शस्त्रक्रिया मोफत यशस्वीपणे करण्यात आली. यासाठी नागपूर येथील “कॉंक्लेअर इंप्लांट” सर्जनसह रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाने अभूतपूर्व मेहनत घेतली. शस्त्रक्रियेनंतरअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अधिसेविका संगीता शिंदे यांनी भेट देत पथकाचे कौतुक केले. तर बालिकेच्या कुटुंबीयांनी पथकाचे आभार मानले.
अमळनेर येथील २२ महिन्यांची बालिका हिला जन्मजात ऐकू येत नसल्याचे निदान झाले होते. त्यासाठी “कॉंक्लेअर इंप्लांट” शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले होते. कानांच्या नसा खराब असल्याने २ वर्षांखालील बालकांवर “कॉंक्लेअर इंप्लांट” शस्त्रक्रिया करण्यात येत असते. बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी जळगाव ‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी नागपूर येथील प्रख्यात “कॉंक्लेअर इंप्लांट” सर्जन डॉ. कांचन तडके यांना आमंत्रित केले. डॉ. तडके यांच्यासह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. राजश्री चोरपगार, सहयोगी प्रा. डॉ. अक्षय सरोदे, सहायक प्रा.डॉ. ललित राणे, वरिष्ठ निवासी डॉ. विनोद पवार यांनी शस्त्रक्रिया केली.
यामुळे बालकाला आता ऐकू येणे शक्य होणार आहे. शस्त्रक्रिया ह्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आली आहे. तर “कॉंक्लेअर इंप्लांट”ची मशिनही अधिष्ठाता डॉ.ठाकूर यांनी मोफत उपलब्ध करून दिली. बालिकेच्या उपचारासाठी वाचातज्ज्ञ (ऑडिओलॉजिस्ट) राजश्री वाघ, मुनज्जा शेख यांचेही सहकार्य मिळाले आहे. शस्त्रक्रियेसाठी कान नाक घसा विभागाचे कनिष्ठ निवासी डॉ. स्नेहल सावंत, डॉ. यश शिसोदे, डॉ. किरण गोरे तसेच बालरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, सहा. प्रा. डॉ. गिरीश राणे, सहायक प्रा. डॉ. इंद्राणी प्रसाद, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर, डॉ. चेतनकुमार आद्रट, डॉ. वैभव सोळंकी, योजनेचे समन्वयक डॉ. डॅनियल साजी, इन्चार्ज परिचारिका रुपाली पाटील, सोमनाथ साखरे, संकिता जाधव, स्वाती सातपुते, दिलीप गावित आदींनी सहकार्य केले.