महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथराव खडसेंवर पलटवार !
मुंबई ( प्रतिनिधी ) – “तहसीलदार निलंबनाचा प्रस्ताव दोन महिने दडपला असा आरोप पूर्णतः खोटा आहे. प्रस्ताव दडपला नाही, तर एका दिवसातच निलंबनाचा आदेश जारी केला,” अशा ठाम शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत वस्तुस्थिती स्पष्ट केली.

खडसे यांनी पत्रकार परिषदेत, पुणे जमीन प्रकरणातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महसूलमंत्री बावनकुळे यांनी दोन महिने दडपला असा आरोप केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले की, “तहसीलदार निलंबनाचा प्रस्ताव माझ्याकडे आल्याबरोबर त्यावर तत्काळ निर्णय घेतला. ५ नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव मंत्रालयात प्राप्त झाला. त्या दिवशी गुरुनानक जयंतीची सुट्टी असूनही मी मंत्रालयात कामकाज सुरू ठेवले आणि तत्काळ निर्णय देत सहा नोव्हेंबर रोजी निलंबनाचा आदेश काढला. त्यामुळे दोन महिने नव्हे, केवळ एका दिवसातच कारवाई केली.”
मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, “कोणी कितीही मोठा असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत. आमचे सरकार पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान आहे. चूक झाल्यास कारवाई निश्चित होते. येथे चुकीला माफी नाही.”
खडसे यांच्या आरोपावर अधिक भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, “खडसे हे स्वतः मंत्री राहिलेले आहेत. त्यांना प्रशासकीय कार्यपद्धती चांगली माहीत आहे. तरीदेखील त्यांनी तथ्य तपासण्याऐवजी आरोपांचा मार्ग निवडला. जर त्यांनी मला विचारले असते, तर येवले यांच्या निलंबनाची तारखेनिहाय संपूर्ण माहिती दिली असती, पण त्यामुळे त्यांच्या आरोपातील हवा निघून गेली असती.”
सदर प्रकरणात पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी मौजे बोपोडी ता. पुणे शहर येथील सर्वे नं. ६२ मधील शासकीय विभागाच्या नावावर असलेल्या जमिनीबाबत जाणीवपूर्वक कायदेशीर प्रक्रिया व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अर्जदाराच्या बाजूने निर्णय दिल्याचा आरोप आहे. ही गंभीर अनियमितता लक्षात घेऊन महसूल विभागाने येवले यांना तत्काळ निलंबित केले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.









