धरणगाव तालुक्यात घेतली विविध विभागांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी बुधवारी धरणगाव पंचायत समितीसह धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची तसेच घरकुलच्या कामांची पाहणी करून विविध सूचना दिल्या. घरकुल योजने अंतर्गत मंजूर असलेल्या व सद्यस्थिती सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
सन २०२४ २५ या आर्थिक वर्षाची अखेर आटोपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी तालुक्याचा दौरा सुरू केला असून बुधवारी पहिल्याच दिवशी मीनल करणवाल यांनी दिवसभर धरणगाव पंचायत समितीसह धरणगाव तालुक्यातील पिंपरी तसेच परिसरातील गावांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामाची कामे, शौचालय बांधकामे तसेच स्वच्छता विषयक पाहणी करून विविध सूचना दिल्या.
त्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन नागरिकांना देण्यात येत असलेल्या आरोग्याच्या सुविधा संदर्भात पाहणी केली. आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या औषधीचा साठा रुग्णांना वाटप करण्यात येत असलेली औषधी याची माहिती देखील जाणून घेतली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक भेट सत्र सुरू केल्याने जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट मोडवर बघावयास मिळाले.