जळगाव (प्रतिनिधी) :- आकाशवाणी चौकातून दुचाकी लांबविणाऱ्या संशयित चोरट्याला तांबापुरा परिसरातून रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.
राहुल गणेश महाजन (वय-२०, रा. तांबापुरा ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. भाऊसाहेब दादाजी बागुल रा. आकाशवाणी चौक, जळगाव हे २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले असता दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित आरोपी राहुल महाजन हा घेऊन जात असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत संशयित संशयित आरोपी राहुल गणेश महाजन याला अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे.