अमळनेर येथे प्रांत, तहसीलदारांना निवेदन
अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी मयुर भंगाळे व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अमळनेर येथे सीसीआय केंद्र बंद होते. नुकतेच केंद्र सुरू झाल्यानंतर उद्घाटनाच्या दिवशी कापसाचे मोजमाप सुरळीत झाले. मात्र दुसऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या कापसात कवडी, कचरा अथवा आद्रता जास्त असल्याची कारणे सांगून प्रतिक्विंटल ५ ते ६ किलो वजन कपात केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

तसेच मोजमापाच्या नावाखाली प्रतिक्विंटल २० रूपये रोख रक्कम घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वजन कपात करताना वाहनाचे वजन मोजताना कमी केलेले वजन त्यात समाविष्ट केल्याने काटापट्टीमध्ये प्रत्यक्ष कपात झालेली दिसून येत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यास केंद्र बंद करण्याची तसेच तालुका ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, दुसऱ्या जिनींगमध्ये सीसीआय केंद्र सुरु करण्याची मागणी केल्यास आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात दुसरे केंद्र सुरू केले जात नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रांताधिकारी व तहसीलदारांनी स्वतः लक्ष घालून सीसीआय केंद्रावरील गैरप्रकार तातडीने थांबवावेत तसेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निवेदन प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, धनगर पाटील, योगेंद्र पाटील, दिनेश पवार, संजय पाटील, रवींद्र देशमुख, महेश पाटील, प्रताप पाटील, रणजित पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केले आहे.









