जयपूर ( वृत्तसंस्था ) ;– आजोबा आणि नातवंडांचं नात खास असतं. लहानाचे मोठे करण्यात आयुष्य खर्ची घातलेल्या एका आजोबांना नातवाने धोका दिला आहे. नातू आपली स्वप्न पूर्ण करेल, अशी आस या आजोबांना होती. पण आपला छोटा नातूच पब्जी खेळाच्या वेडापायी आपली फसवणूक करतोय ही गोष्ट एक दिवस त्यांच्या लक्षात आली.

जयपूर येथील चित्रकूट येथे राहणाऱ्या वृद्ध गृहस्थाने त्यांची साडेपाच लाख रुपयांना फसवणूक झाली आहे. तसेच त्यांच्या बँक खात्यातून ही मोठी रक्कम कोणीतरी काढून घेतली आहे, अशी तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
पोलिसांनी त्यांचे बँक खाते तपासले. त्यांच्या खात्याची तांत्रिक तपासणी केली. त्यात असे आढळून आले की, आजोबांच्याच मोबाईल नंबरवरून त्यांच्या मोबाईलमधील पेटीएम अॅपद्वारे हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत. मात्र यावर पोलिसांत तक्रार केलेल्या आजोबांचं असं म्हणणं होतं की, त्यांना पेटीएमसारख्या कोणत्याच अॅपचा (वॉलेट) वापर करता येत नाही. त्यानंतर पोलीस तपासणीत हे उघड झाले की, त्यांचा नातू त्यांच्या मोबाईलवर पब्जी खेळतो. त्यानेच आजोबांच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅप डाऊनलोड केले होते. पेटीएमद्वारे पैसे ट्रान्सफर झाल्यावर तो अॅप डीलिट करत असे.
आजोबांच्या ज्या खात्यातून पैसे पेटीएम वॉलेटद्वारे पाठवले गेले, त्या खात्यातले पैसे त्यांचा नातू ऑनलाईन गेम खेळण्यासाठी वापरत होता. तसेच पब्जी गेम खेळण्याकरिता पुढच्या पुढच्या लेव्हल क्रॉस करण्यासाठी आजोबांच्या खात्यातून ई-वॉलेटच्या माध्यमातून पैसे कापले जात होते, असा खुलासा सायबर पोलीस ठाण्याचे एस आय ईमीचंद यांनी केला आहे.







