चोपड्यात शेतकरी संघटनेची मागणी
चोपडा ( प्रतिनिधी ) – कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा अहवाल केंद्रीय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर केला. त्यानुसार सीसीआयने राज्यात जिल्हानिहाय कापूस खरेदी केंद्रांवर प्रत्यक्षात खरेदी करतांना हेक्टरी ८ ते १२ क्विंटल पर्यंत कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने हेक्टरी ३० क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

सीसीआयने यावर्षी नोंदणीच्या जाचक अटींसह जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र कमी सुरू केल्याने केंद्र वाढीसाठी शेतकरी संघटना पाठपुरावा करीत असतांना कृषी विभागाने नवीन अहवाल गुरुवारी वस्त्रोद्योग मंत्रालयात सादर केल्यानंतर हेक्टरी तुटपुंजी कापूस मर्यादा वाढवली आहे. परंतु, वाढ केलेली मर्यादा ही खूपच कमी आहे.
बहुतांश शेतकरी प्रति एकर सरासरी १० ते १५ क्विंटल कापसाचे उत्पादन घेत असतात म्हणून कापूस खरेदी मर्यादा हेक्टरी ३० क्विंटलप्रमाणे खरेदी करावी, अशी मागणी आहे. कापसाची उत्पादकता काढताना कृषी विभागाने सन-२०२४-२५ मधील पीक कापणी प्रयोगातील कापसाची सरासरी उत्पादकता व एकूण पीक कापणी प्रयोगांपैकी उच्चतम उत्पादकता असलेल्या २५ टक्के प्रयोगाच्या आधार घेतल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. वास्तवात एकाच जिल्ह्यातील विविध महसूल मंडळातील, तसेच एकाच शेतातील वेगवेगळ्या भागातील पिकांची उत्पादकता भिन्न असते कारण ती हवामान व इतर बाबींवर अवलंबून असते. त्यामुळे सरासरीऐवजी कमाल उत्पादकता धरून कापूस खरेदी करणे गरजेचे आहे, असे शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, यांनी सांगितले.
शासनाची जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा
नाशिक ७.९५ क्विंटल, धुळे ४.३०, नंदुरबार ४.९९, जळगाव ५.३४, अहिल्यानगर ६.८४, सोलापूर २.७३, छत्रपती संभाजीनगर ५.६६, जालना ४.७६, बीड ८.४३, लातूर ९.८८, धाराशिव ६.०४, नांदेड ६.४७, परभणी ६.३३, हिंगोली ५.३५, बुलढाणा ६.३३, अकोला ६.१७, वाशिम ७.३९, अमरावती ८.७५, यवतमाळ ५.७८, वर्धा ९.२०, नागपूर ७.९७, चंद्रपूर ८.२४ आणि गडचिरोली जिल्ह्यात मर्यादा प्रति एकर ९.३२ क्विंटल ठरविण्यात आली आहे.









