पिंपळगाव हरेश्वर येथे अज्ञातावर गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी): शेतात काम करत असताना एका तरुणाला मागून येऊन विहिरीत ढकलून देत त्याच्या जिवितास धोका निर्माण केल्याची धक्कादायक घटना अटलगव्हाण शिवारात घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दीपक गजानन तेली (वय २६, रा. अटलगव्हाण) हे २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास जितेंद्र शिवदास पाटील यांच्या शेतात ‘गिलके’ (तोरई) क्रेटमध्ये भरण्याचे काम करत होते. त्यावेळी शेतातून कोणीतरी जोरात आवाज दिला, “झालं का? झालं का? लवकर आवरा, गाडी आली!” हा आवाज कोणाचा आहे हे पाहण्यासाठी दीपक तेली विहिरीकडे गेले. विहिरीवर कोणीही दिसले नाही, म्हणून त्यांनी विहिरीत वाकून पाहिले असता, मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांना निष्काळजीपणे विहिरीत ढकलून दिले.
सदर विहीर १० ते १५ फूट पाण्याने भरलेली होती. मात्र, फिर्यादी दीपक यांना पोहता येत असल्याने त्यांनी शिताफीने विहिरीबाहेर धाव घेतली. विहिरीबाहेर आल्यावर त्यांनी आजूबाजूला पाहिले असता ढकलणारा इसम तेथून पसार झाला होता. या घटनेत दीपक यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी दीपक तेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
सपोनि कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस नाईक पांडुरंग गोरबजारा तपास करीत आहेत. पोलीस आता त्या अज्ञात इसमाचा शोध घेत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.









