पाचोरा तालुक्यात जुन्या वादातून जीवघेणा हल्ला
पाचोरा (प्रतिनिधी): रस्त्याच्या वहिवाटीवरून असलेल्या वादातून आणि जुन्या राजकीय वैमनस्यातून एका ४५ वर्षीय शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी प्रवीण मधुकर महाजन (वय ४५, रा. श्रीराम चौक, बाहेपुरा, पाचोरा) हे २१ जानेवारी रोजी सायंकाळी ४:२५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील घनश्याम नथानी यांच्या चहाच्या टपरीसमोर उभे होते. यावेळी आरोपींनी रस्त्याच्या वहिवाटीबाबत घेतलेल्या आक्षेपामुळे जुना राग मनात धरून प्रवीण महाजन यांना गाठले. संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून महाजन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी दादू गोपाळ माळी याने फिर्यादीचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता, जमावापैकी एकाने लोखंडी हत्याराने महाजन यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
मारहाण करताना आरोपींनी, “नगरपालिकेच्या निवडणुकीत तुझ्या अंगात खूप शिवसेना आली होती का?” असे म्हणून शिवीगाळ केली व पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. वासुदेव भिवसन माळी, गोपाळ भिवसन माळी, दादू गोपाळ माळी, पांडुरंग भिवसन माळी, ईश्वर भिवसन माळी, जनार्दन भिवसन माळी, ललित ईश्वर माळी, उमेश गोपाळ माळी (सर्व राहणार श्रीराम चौक, बाहेपुरा, पाचोरा) अशी संशयित आरोपीची नावे आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार दत्तात्रय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कृष्णा घायोळ हे करत आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.









