सलग गोळीबार, हत्या, चोरीच्या घटनांनी प्रशासन हादरले
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे चित्र दिसत असून गुन्हेगारीचे प्रमाण आता भयावह टप्प्यावर पोहोचले आहे. शहरातील सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत असून, गुन्हेगारांच्या टोळ्या खुलेआम एकमेकांवर हल्ले, गोळीबार आणि खूनासारख्या घटनांत गुंतल्या आहेत. काही घटनांमध्ये निरपराध नागरिकांचे प्राण घेतले जात असल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता ठोस पावले उचलावीत आणि कठोर कारवाई केली पाहिजे.
जळगावात अलीकडेच पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली असली, तरी गुन्ह्यांचा आलेख खाली आलेला दिसत नाही. रविवारी रात्री कांचन नगर परिसरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याच काही दिवसांपूर्वी एमआयडीसी भागातही गोळीबाराची पुनरावृत्ती झाली. याआधी कुसुंबा येथे घरावर गोळीबार झाला होता, तर भुसावळ, चोपडा आणि रावेर परिसरात खुलेआम शस्त्रसाठा आढळून आला आहे. तांबापुरा येथे सकाळी झालेली दगडफेक पोलिसांनी रोखली असली, तरी रात्री पुन्हा गोळीबाराने शहर हादरवले.
घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, काही दिवसांपूर्वी एका विरोधी पक्षातील आमदारांच्या बंगल्यावर लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले. लोकप्रतिनिधींच्याच घरात चोरी होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एलसीबीसह इतर गुन्हे शाखांचे कामकाज गोळीबाराच्या घटनांनंतर निष्क्रिय झाल्यासारखे दिसत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी अलीकडेच पदभार घेतला असला तरी त्यांच्या कामगिरीचा ठोस प्रभाव अद्याप दिसत नाही. बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये निष्काळजीपणा आणि शिथिलता जाणवते. कारागृहाची स्थितीही अत्यंत दयनीय असून, केवळ २०० क्षमतेच्या तुरुंगात तब्बल ५५० बंदी ठेवले गेले आहेत. फक्त ३५ ते ४० कर्मचाऱ्यांच्या मर्यादित मनुष्यबळावर हे सर्व सांभाळताना कारागृह प्रशासनाची ससेहोलपट होत आहे. तुरुंगातसुद्धा बंद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत, हे परिस्थितीचे गांभीर्य दर्शवते.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या खांद्यावर आहे. नागरिक मात्र प्रशासनाने आता ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.









