भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची केली दिशाभूल
भुसावळ प्रतिनिधी पोलिसांच्या डायल ११२ वर “माझ्या भावाचा खून झाला आहे, तात्काळ मदत पाठवा” असा खोटा संदेश देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री घडली. भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक मनोज भागवत गालफडे यांनी याबाबत सरकारी फिर्याद दिली आहे. फिर्यादीसह पोलीस हर्षल महाजन हे रात्र गस्तीवर असताना रात्री १२.३६ वाजता डायल ११२ वरून “माझ्या भावाचा खून झाला आहे, तात्काळ मदत पाठवा” असा संदेश प्राप्त झाला. हा संदेश मोबाईल क्रमांक ८९९९६२६८८४ वरून पाठविण्यात आला होता.
सदर घटनेची तातडीने पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद आढळला. त्यानंतर पथकाने दिलेल्या पत्त्यानुसार गांधी नगर, गडकरी नगर परिसरातील कमन सर्विस सेंटर येथे जाऊन तपास केला. तेथे चौकशीत संबंधित व्यक्ती बाळू कापसे याने “मी डायल ११२ वर चुकीची माहिती दिली” अशी कबुली दिली.
प्राथमिक तपासानुसार, सदर ठिकाणी कोणताही खून किंवा गुन्हा घडलेला नसून, आरोपीने पोलीस यंत्रणेला दिशाभूल करण्यासाठी जाणूनबुजून खोटी माहिती दिली होती. या प्रकरणी बाळू कापसे, रा. कमन सर्विस सेंटर, गांधी नगर, गडकरी नगर, भुसावळ याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.









