जळगाव शहरातील कोल्हेनगर येथील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
घरमालक डॉक्टरांवरही गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कोल्हे नगर भागातील शंभर फुटी रस्त्यावरील एका घरात गोळीबार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर मित्राला बंदूक दाखवीत असताना अचानक गोळी सुटल्याचे तपासातून दिसून आले आहे. दरम्यान, गोळीबार झालेले घर हे भाडे तत्त्वावर दिलेले असून घर भाड्याने देण्याविषयी महापालिका, पोलिसांना माहिती न दिल्याने घरमालक असलेल्या एका डॉक्टरांवरही गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
दीपक लक्ष्मण तरटे (वय २७, रा. नागसेन नगर, मेहरूण, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दिपकवर यापूर्वीदेखील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.(केसीएन)डॉ. देवेंद्र शेळके यांच्या घरात राजदीप राजू सपकाळ (वय ४४) हे भाडेकरू म्हणून राहतात. बुधवारी दि. ६ रोजी मध्यरात्री राजदीप हे घरी परिवारासह जेवण करीत होते. तेव्हा त्यांचे मित्र दीपक तरडे आणि एक अल्पवयीन मुलगा असे दोघे आले. तेथे गप्पा करीत असताना राजदीपला दीपक याने बंदूक काढून दाखविली. बंदूक दाखवीत असताना अचानक त्यातून एक राउंड फायर झाला.
हि गोळी माळ्यावरील भीतीला लागली. त्यावेळी घाबरून दीपक हा अल्पवयीन मित्रासह तेथून निघून गेला. याबाबत गुरुवारी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यांना घटनास्थळी गोळीची एक पुंगळी सापडली. तसेच, तपासाअंती महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)त्यानुसार दीपक तरटे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत आता घरमालक डॉ. देवेंद्र शेळके यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
*भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक*
मध्यरात्रीच्या वेळी गोळीबार झालेले घर हे भाडे तत्त्वावर दिलेले असून घर भाड्याने देण्याविषयी महापालिका, पोलिसांना माहिती न दिल्याने घरमालक डॉ. देवेंद्र भिमराव शेळके (रा. कोल्हे नगर) यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात राहणारे राजदीप सपकाळे यांनी हे घर भाड्याने घेतले आहे.(केसीएन) घरमालक डॉ. देवेंद्र शेळके यांनी हे घर भाड्याने देण्याबाबत स्थानिक पोलिस ठाणे, महापालिकेला कळविले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोहेकॉ राहुल चौधरी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून देवेंद्र शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.