अमळनेर पोलिसांची शिरपूर तालुक्यात म्हळसर येथे कारवाई
अमळनेर प्रतिनिधी : – पोलिसांना चकवा देऊन विविध ठिकाणी वाहने चोरणाऱ्या शिरपूर तालुक्यातील म्हळसर येथील अट्टल चोराला अमळनेरच्या डीबी पथकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने झडप घालून अटक केली आहे. न्यायालयाने संशयित आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वावडे येथील कमलाकर लोटन पाटील यांची मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ डी डब्लू २३९२) ही १ मार्च रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अज्ञात चोराने चोरून नेली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीबी पथकाला सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते. डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, प्रशांत पाटील, विनोद संदानशिव, उज्वल म्हस्के यांनी कॅमेऱ्यात आरोपीचा शोध घेऊन आरोपीची ओळख पटवली.
तो शिरपूर तालुक्यातील म्हळसर येथील भैय्या उर्फ तुषार शालीग्राम वाकडे (कोळी) असल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने चकवा दिला. पोलिसांना तो गावात असल्याची माहिती मिळताच साध्या वेशात जाऊन संशयित आरोपी तुषार शेताजवळ रस्त्यावर उभा असताना त्याला कपिलेश्वरचा रस्ता कुठून जातो असे विचारले. तो बोलत असतानाच त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. त्याच्याजवळून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली. तुषारला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी मारवड हद्दीतून ट्रॅक्टर चोरून नेले होते. त्याच्याविरुद्ध नंदुरबार, नरडाणा, शिरपूर येथे वाहने चोरीचे गुन्हे दाखल आहेत.