चोपडा तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हातेड खुर्द येथील शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोटॅश खत बनावट असल्याबाबत कृषी विभागाकडे तक्रार आली होती. या तक्रारीवरून कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई करीत बनावट पोटॅश खताच्या ९६ हजार ९०० रुपयांच्या एकूण ५७ बॅग मुद्देमाल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. हि कारवाई आणखी तीव्र करण्याची अपेक्षा शेतकऱ्यानी केली आहे.
कृषी सहाय्यक विलास मोरे यांनी तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचत बनावट पोटॅश खताच्या ९६ हजार ९०० रुपयांच्या एकूण ५७ बॅग मुद्देमाल जप्त केल्याने धुळे व जळगाव जिल्ह्यात बनावट खताचीही विक्री होत असल्याने उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा गुण नियत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी गुरुवारी दिलेल्या सूचनेनुसार मौजे हातेड खुर्द येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील (वय ४५) यांनी कृषी विभागाकडे पोटॅश या खताच्या गुणवत्तेविषयी तक्रार केली होती.
तालुका कृषी अधिकारी दीपक सांळुखे व अरुण तायडे यांनी या शेतकऱ्याकडे जाऊन पोटॅश या खताची बॅगची व त्यामधील खताची तपासणी केली असता त्यांना या खताबाबत बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यास विचारले असता त्यांनी सांगितले, की मंगलचंद झुंबरलाल जैन (मु.पो. तोंदे, ता. शिरपूर) यांनी त्यांना या खताच्या ७ बॅग १ हजार ७०० रुपये दराने आणून दिल्या होत्या. या खताची पावती अथवा बिल दिले नव्हते. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी खताच्या पिशव्या परत करण्यास सांगितल्या. या सर्व प्रकारावरून कृषी अधिकारी यांनी सुरजमल मोहनलाल जैन यांच्या दुकानाच्या गोदामात छापा मारला असता त्या ठिकाणी म्युरीट ऑफ पोटॅश (एमओपी) या आयपीएल कंपनीच्या बनावट प्रति बॅग ५० किलो वजनाची खताच्या ५७ बॅग आढळून आल्यात.
गोदाम मालका सुरजमल जैन यांनी मात्र जबाबदारी झटकत, हा खत साठा कैलास वासुदेव पाटील (रा. तोंदे) यांनी माझ्या घरात कापूस भरलेला असून, खते ठेवण्यासाठी जागा नाही. काही दिवस खत राहू द्या, अशी विनंती केल्याने मी ती खते ठेवली आहेत, असे सांगितले. कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट खत विक्रीसाठी आणले. कैलास पाटील यांना सुरजमल जैन यांच्या भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता हे खत किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद) यांनी बिगर बिलाचे दिले असल्याचे सांगितले. यानुसार बनावट खताच्या ५७ बॅग प्रति बॅग ५० किलो वजनाची, प्रति बॅग किमंत १ हजार ७०० प्रमाणे मुद्देमाल ९६ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन करण्यात आला.
तोंदे गावात साठवणूक केलेले खत हे हातेड खुर्द येथील शेतकरी किशोर पाटील यांना देऊन फसवणूक केली. म्हणून मंगलचंद झुबंरलाल जैन (रा. तोंदे, ता. शिरपूर), कैलास वासुदेव पाटील (रा. तोंदे), किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद, ता. शिरपूर) या आरोपींनी संगनमताने नकली खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याने शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केल्याने धुळे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या फिर्यादी वरून थाळनेर ता. शिरपूर या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.