जळगाव येथील त्रिभुवन कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दारूच्या नशेतील चोरट्याला पार्किंगमध्ये लावलेली कार चोरी करताना कार मालकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. मंगळवारी ता. २८ रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास कानळदा रोडवरील त्रिभुवन कॉलनीत हा प्रकार घडला. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.
बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीस असलेले महेंद्र रामेश्वर पांडे यांनी कार (एमएच १७ एल्लेड ११५९) घराच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्यांना मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज आला. खिडकीतून डोकावल्यावर त्यांना चोरटा घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीजवळ उभा असलेला दिसून आला. त्यानंतर चोरटा इथून खाली उतरून पार्किंगमध्ये असलेल्या कारचा दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करीत होता.
पांडे यांनी शिवाजी नगरातील लाकूड पेठेत राहत असलेले त्यांचे भाऊ जितेंद्र पांडे यांना बोलावून घेतले. भाऊ आणि पुतण्या घराजवळ येताच पांडे घराबाहेर आले. त्यांना पाहताच चोरटा पळून जात असताना पांडे यांनी पकडले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, चंद्रकांत सोनवणे हे त्याठिकाणी आले. त्यांनी चोरट्याची विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव राकेश राजू वानखेडे (वय २८, रा. कानळदा) असे सांगितले. शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.