जळगावात कार अडवून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास

रामानंदनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा ; दोघे ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात जबरी चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींनी मारहाण करत रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी अक्षय एकनाथ ब्राम्हे (वय २७, रा. अमळनेर, ता. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ३ वाजता पिंप्राळा हुडको, बौद्ध विहाराजवळील सर्व्हिस रोडवर ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीची मारुती कार (क्र. GJ-06-LS-9485) अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर फिर्यादीकडील ९,००० रुपये रोख तसेच मित्र विवेक सांगोळे यांचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले.
या प्रकरणात आरोपी म्हणूनअनिल उर्फ मारी भगवान सोनवणे (वय २०)मनीष सम्राट थांबे (वय २३, रा. कुंभार वाडा, पिंप्राळा)
यांची नावे निष्पन्न झाली असून, दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी सचिन रणशेवे करीत आहेत.









